बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी उलाढाल होत असते. मात्र नव्याने उभे करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांना गाळे देण्याचे सांगून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असून संबंधित अधिकारी व एपीएमसी सदस्यांवर कधी आळा बसणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
एपीएमसीमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजी मार्केट गाळ्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा भ्रष्टाचार एपीएमसी सदस्य व अधिकाऱ्याने केल्याचेही ही बोलले जात आहे. मात्र या भ्रष्टाचारावर कुणाचा रोख नसल्याने हा फोफावत चालल्या चा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नेमकी कुणाची पोळी भाजते आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एपीएमसीमध्ये 132 गाळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या पैकी 32 गाळे राखीव ठेवून उर्वरित भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. पण 32 गाळ्या करिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर गाळे व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत असताना संबंधित व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मागील वेळीही सेक्रेटरीने मोठा गोंधळ केल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता पुन्हा या गाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.
किल्ला येथील भाजी मार्केट परिसरात मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मात्र एपीएमसी मधील सदस्यांनी आणि काही वरिष्ठ राजकीय नेत्यांनी याला विरोध करत सदर भाजी मार्केट एपीएमसीमध्ये हलविले. त्यानंतर गाळे लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कोट्यावधीची माया अनेकांनी जमवण्याचे ही आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराकडे कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.