कणबर्गी येथे चोरट्यांनी चोरी करून घराला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंडॉल रोड कणबर्गी येथे ही घटना घडली असून या घटनेने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मंगळवारी रात्री सोमाप्पा सोमांना तळवार यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. चोरट्याने पंचवीस हजार ररोख रुपये पाच तोळे सोनं पंधरा तोळे चांदी टिव्ही फर्निचर लहान मुलांच्या खेळणाऱ्या वस्तू कपडे याच्यासह तांदूळ आदी साहित्य चोरट्यांनी पळवले आहे. जाता जाता त्यांनी घराला आग लावली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सोमाप्पा व त्यांचे कुटुंबीय मंगळवारी रात्री आपल्या नवीन घरामध्ये झोपण्यासाठी गेले होते. जुन्या घराला समोरून कुलूप लावून ते गेले होते. मात्र रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी समोरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी केली आहे. विशेष म्हणजे चोरी करून झाल्यानंतर घराला आग होऊन चोरटे फरार झाल्याने मोठा गोंधळ उडाला.
सोमाप्पा व त्यांचे कुटुंबीय यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र रात्री आगीचा धूर दुसऱ्यांच्या घरी शिरल्याने बाजूच्या घरातील मंडळी जागे होऊन याची माहिती त्याला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला फोन केला. त्याआधी परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. त्याची माहिती मारुती पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर हे पुढील तपास करीत आहेत.