शहरात घडलेले हनी ट्रॅप प्रकरण पोलीस खात्याने गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार पोलीस खात्याने केला आहे.
तरुणांना,धनिकाना,सरकारी अधिकाऱ्यांना प्रेमाचे नाटक करून लुटणाऱ्या तीन महिला आणि चार तरुणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केल्यानंतर त्यांची रवानगी हिंडलग्याला केली आहे.सोमवारी या सात जणांना अधिक चौकशीसाठी पोलिसांनी पोलीस कोठडीत घेण्याचे ठरवले आहे.हनी ट्रॅप प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
तरुणांना,पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून एकांतातील फोटो आणि व्हीडिओ काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा उद्योग कितीतरी काळापासून सुरू होता.अब्रू जाईल या भीतीने अडकलेल्या व्यक्ती पैसे देऊन गप्प बसत होते.अखेर एका तरुणाने धाडस करून पोलिसात तक्रार केल्यावर पैसे देताना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
विद्या उर्फ सारिका पांडुरंग हवालदार (वय 29), दीपा उर्फ दीपाली संदीप पाटील (वय 32, दोघीही रा.महाव्दार रोड, दुसरा क्रॉस), मंगला दिनेश पाटील (वय 35, रा. कोरे गल्ली, शहापूर), मनोहर आप्पासाबपायकण्णावर (वय 32, रा. हलगा), नागराज रामचंद्र कडकोळ (वय 36, रा. देवराज अर्स कॉलनी,बसवनकुडची), सचिन मारुती सुतगट्टी (वय 33, रा. सह्याद्रीनगर), महम्मदयुसुफ मिरासाब कित्तूर (वय 30,रा. इटगी, ता. खानापूर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.
पाच हजार पासून दहा लाख रु पर्यंतची रक्कम अनेकांकडून या हनी ट्रॅप टोळीने उकळली आहे.अटक केलेल्याकडून अनेक फोटो आणि व्हीडिओ मिळाले असून त्याच्या आधारे आता पोलीस पुढील तपास करणार आहेत.पोलीस चौकशीत अनेक बड्याची, धनिकांची नावे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.