अपुऱ्या बस पुरवठ्यामुळे तालुक्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र याकडे परिवहन महामंडळाने साफ दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये खाजगी वाहन धारक क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांचा भरणा करून वाहतूक करत आहेत. त्यामुळे ही धोकादायक वाहतूक कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अनेक गावात बस सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना अजूनही पायपीट करावी लागते. तर काहींना खासगी वाहनांचा प्रवास करावा लागतो. याकडे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आल्या तरी साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक खाजगी वाहनधारकांची चलती सुरू असून नागरिकांच्या जीवाशी मात्र खेळ सुरू असल्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
संपूर्ण तालुक्यात काही गावांना बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावातील विद्यार्थी व नागरिकांना बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. विशेष करून विद्यार्थ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात सुरू असून परिवहन महामंडळाकडे याबाबत तक्रारी करण्यात आले आहेत. मात्र परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खाजगी वाहन धारक मात्र क्षमतेपेक्षा अधिक भरणा करून नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे. यातच रस्त्यांची झालेली वाताहत आणि क्षमतेपेक्षा अधिक भरणा केल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येक गावाला बस सोडावी अशी मागणी करण्यात येत आहे.