‘लोकमान्य’सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. काळाच्या भाळावर काय लिहिले आहे ते येणारी वेळच ठरवेल. अनेक संस्था धडाधड कोसळत असताना,अनेक ठिकाणी आर्थिक समस्या निर्माण होत असताना लोकमान्य एका बाजूने आपली वाटचाल करतच होती. लोकमान्य बाबतीत स्थापनेपासून अनेक वावड्या उडविल्या गेल्या आहेत,आणि जातच आहेत. पहिल्या दोन-तीन शाखा उद्घाटनानंतर लोकमान्यला अपशकून करण्याचे प्रयत्न केले गेले. पण त्यावेळी लोकमान्यचा चेहरा ‘तरुण भारत’ असा होता आणि पत्रकारितेच्या विश्वासाच्या जोरावर लोकमान्य टिकत गेली आणि वाढतच गेली. जसा लोकमान्यांचा विस्तार वाढला तसा लोकमान्यच्या लोकाभिमुख उपक्रमांचा पैस वाढत गेला.
प्रत्येक क्षेत्रात लोकमान्य आपला ठसा उमटऊ लागले सामाजिक, साहित्यिक, क्रीडा ,सांस्कृतिक प्रत्येक ठिकाणी लोकमान्यने आर्थिक पाठबळ उभे केले. लोक जमा होत गेले. लोकमान्य खर्याअर्थाने लोकांच्यात मान्यता पावत गेली. ह्या संस्थेला एक चेहरा आहे. सुसंस्कृतपणाचा. तेच त्यांचे भांडवल आहे. माणसं राबतात, पैसे कमवतात. त्यांना ती ठेव एका सुरक्षित ठिकाणी ठेवायची असते. अधिक लाभ आणि परताव्याची हमी .,अशा कसोट्यांवर जी संस्था खरी ठरते. तिथेच ही पुंजी जमा केली जाते. लोकमान्यमधील अशा ठेवींची संख्या करोडोंच्या घरात आहे. राष्ट्रीयकृत बँकाही ज्या प्रसंगात हतबल झाल्या, तशाही प्रसंगी लोकमान्य टिकलीच.
सध्या देशभर अस्थिर आर्थिक स्थिती आहे. जागतिक मंदीने समाज व्यवस्थेला कृश केलेले आहे. समाजातला प्रत्येक घटक पैशाच्या तंगीतून भरडला जात आहे. व्यावसायिक पातळीवर अंधःकारमय स्थिती आहे. अनेक उद्योग बंद पडत आहेत. लोकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. अशावेळी आपल्याकडे असलेली रक्कम अधिक नफ्यासह सुरक्षित ठेवण्याची धडपड अनेक जण करत आहेत. ज्यांचे वय झाले आहे त्यांना येणाऱ्या व्याजावर दिवस काढावे लागतात. त्यांना थोडा अधिक पैसा हातात यावा अशी अपेक्षा असते. त्यांना लोकमान्य सारख्या संस्था जवळच्या वाटतात. लोकमान्यमध्ये अशा अनेक वृद्धांचे पैसे जमा आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार करताना सामान्य माणसाला अवघडल्यासारखे वाटते. त्यांच्या अवाढव्य व्यवहारात त्यांचा संकोच वाढतो. तिथल्या व्यवहारात असणारा त्रयस्थ व्रुत्तीचा भाव त्याला अडचणीचा वाटतो .येथील क्लिष्ट व्यवहार पद्धती त्याच्या अंगवळणी पडण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीत बहुतांशी सामान्य लोक पतसंस्था, क्रेडिट सोसायट्यात व्यवहार करणे पसंत करतात. तेथीली सुलभ कार्यपद्धती, वैयक्तिक घेतलेली दखल ,त्यांच्याशी केलेले समजूतदारपणाचं वागणं त्यांना नैसर्गिक वाटते. लोकमान्य सोसायटीत अशा बहुजन वर्गातून आलेल्या बहुतांशी लोकांची खाती आहेत.
लोकमान्यचा पसारा देशभरात 225 पेक्षा अधिक शाखांचा आहे. असा प्रयोग पूर्वी काही देशात झालेला आहे, आणि तो यशस्वीही झालेला आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन ह्या सोसायटीने अनेक राज्यात शाखांचे जाळे विणले आहे. लोकांनीही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या संस्थेत अनेक लोकांनी पैसे गुंतविले आहेत. आपली स्वप्ने त्या संस्थेशी निगडित केली आहेत., त्यामुळे ही संस्था समाजाच्या जीवनाशी निगडित आहे.तीन हजारांहून अधिक कर्मचारी वर्ग लोकमान्यमध्ये आहे.प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो लोकांच्या पर्यंत लोकमान्यची मुळे पसरली आहेत. त्यामुळे ह्या संस्थेला नख लागणं समाजाला किंबहुना सामाजिक स्वास्थालाही परवडणारे नाही.
सीमावर्ती भागातून उगम पावलेली ही संस्था, मराठी माणसाला आपली वाटली तर नवल ते काय? बहुंताशी मराठी सांस्कृतिक क्षेत्राला या संस्थेचे पाठबळ लाभतेच. अनेक संस्थांच्या उभारणीत लोकमान्यचा हात आहे. कित्येक क्रीडापटूंनी आपली कारकीर्द लोकमान्यच्या पाठबळावर घडविली आहे. काही अपवाद वगळता मराठी साहित्य संमेलनाला ही संस्था मदत करतेच. येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानातील जरी फटक्याला डौलाने फडकत ठेवण्यात लोकमान्यांचा हातभार आहेच. लोकमान्य ग्रंथालय. लोकमान्य रंगमंदिर (रिझ थिएटर) अशा अनेक संस्था लोकमान्यांने उभ्या केल्या, आणि सन्माननीय केल्या.
लोकमान्यची शासकीय नियमांच्या आधारे काही चौकश्या चालू आहेत .अशा अनेक संस्थांच्या बाबतीत चालू असतात. त्यात वेगळेपण काही नाही.संस्थाचालकांनी संस्था चालवाव्यात आणि शासनाने त्यावर नियंत्रण ठेवावे.वेळोवेळी चौकशी करावी,ही सुदृढ आर्थिक व्यवहार पद्धतीची रीत आहे. त्यात बिथरून जाण्यासारखे काही नाही.या संस्थाचालकांचा सामाजिक स्थर पाहता, या संस्थेत काही अनियमितता झाली असेल ,अशी शंकाधुसर आहे. त्यामुळे नागरिकांनी सहजपणे या व्यवहाराकडे पाहिले पाहिजे
मराठी माणसाचा चेहरा असणारी,ही संस्था या दिव्यातून पार पडलीच पाहिजे. संस्था चालकांसाठीही हे अग्निदिव्यच आहे. यातून तावूनसुलाखून बाहेर पडाल तर उद्याच्या सूर्य तुमचाच आहे!!
गुणवंत पाटील -साहित्यिक बेळगाव