बेळगाव जिल्ह्याला महापुराचा विळखा घट्ट झाल्यानंतर सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवस शाळा सुट्टी दिल्या होत्या. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा कालावधी नंतर भरून काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र हा कालावधी भरून काढण्याचे बाजूलाच राहिले उलट शालेय वेळेत खाजगी कार्यक्रमातील सत्कार समारंभात शिक्षक मुख्याध्यापक मग्न असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पालकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नुकतीच बेळगाव जिल्ह्यातील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मागील महिन्याभरापासून याच गोंधळात काही शिक्षक अडकले आहेत. शैक्षणिक वर्षाचा विचार करतात शासकीय सुट्ट्यांची संख्या स्थानिक सुट्ट्या यामुळे विद्यार्थी शिक्षकांचा कितीसा वेळ शैक्षणिक अभिसरणाकडे असतो हा वादविवादाचा विषय होईल. त्यातच राजकीय कार्यक्रम वेगवेगळ्या आंदोलना मधील विद्यार्थी शिक्षकांचा सहभाग सध्या वाढत असल्याचे दिसून येतात.
मागील महिन्याभरापासून विविध समारंभात विविध कामात शिक्षक गुंतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे शिकवण्याच्या दृष्टीने पाहिल्यास काहीच वेळ मिळत असल्याने पालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिकवणी कमी आणि उचापति जास्त अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव्य सामोरे येत असून याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था सध्या शाळांची दिसून येत आहे. त्यामुळे काहीजण खाजगी शाळेत घालण्यातच धन्यता मानत आहेत. अशा परिस्थितीत देखील जर सरकारी शाळेतील शिक्षकांनी योग्य शिकवणी घेतली नाही आणि इतर कामात लक्ष घातले तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे याबाबत गुरुजींनी सत्कार समारंभ सोडून जरा पोरांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.