बेळगाव परिसरातून जाणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा कमालीचा विरोध होत असताना पुन्हा एकदा मुतगा भागातील शेतकऱ्यांना नोटिसा काढण्याचा प्रकार घडला आहे. त्या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुडाला प्रखर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच मुतगा विभागातील शेतकऱ्यांना रिंग रोडसाठी भूसंपादनाची नोटीस आलेल्या आहेत .त्या नोटीस देऊन शेतकऱ्यांची डोकी भडकली आहेत. भडकलेल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला असून बेळगाव live ला मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी प्रखर आंदोलन करणार आहेत.
रिंग रोड ची घोषणा जेव्हा झाली तेव्हापासूनच साबरा मुतगा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. हा विरोध कायम असतानाच सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्यांना धारेवर धरून त्यांचे साहित्य आणि सर्वेक्षणाचे वस्तू जप्त करण्याचा प्रकार घडला होता.
या संदर्भात तालुका पंचायत मध्ये आवाज उठवण्यात आला आहे .तालुका पंचायत सदस्य असलेले सुनील अष्टेकर यांनीही जोरदार विरोध करून प्रशासकीय गलथानपणाचा निषेध नोंदवला होता. तरीही भूसंपादन करण्याचे काम सुरूच आहे. त्याविरोधात सध्या शेतकर्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकांची लागवड केली आहे .भात पीक भरात आलेले आहे. शेतामध्ये उभे पीक असतानाही भूसंपादनाच्या नोटिसा घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याची किंमत नाही का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्यामुळे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.