दसऱ्या निमित्य वेंकटरमण देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.अडीचशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बेळगावच्या रथोत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
शहापूर आणि बेळगाव येथे वेंकटरमणाची दोन मंदिरे आहेत.या दोन्ही मंदिरांचा रथोत्सव विजयादशमी दिवशी असतो.मंदिराकडून रथोत्सवाला प्रारंभ होतो.रथात वेंकटरमण्णाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करून फुलांनी सजवलेल्या रथोत्सवाला प्रारंभ होतो.रथ ओढण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रथाच्या मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.ठिकठिकाणी भक्तांकडून आरती करून श्रीफळ वाढविण्यात येत होते.भाविकांकडून रथावर पुष्पवृष्टी केली जात होती.रथासमोर महिलांनी टिपऱ्या खेळून आणि फुगडी घालून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.शहरातील विविध मार्गावर रथ फिरून पुन्हा मंदिराकडे आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली.