जोधपूर (राजस्थान) येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय वायू सैनिक शिबीरात केएलई संस्थेच्या आरएलएस महाविद्यालयाची विद्यार्थीनी तसेच 8 कर्नाटक एनसीसी स्कॉड्रनची छात्रा मानसी उदयसिंग होनगेकर हिने नेमबाजीत स्कीट शुटींग प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आहे.
21 राज्यांतून सुमारे 600 एनसीसी छात्रांनी या शिबीरात सहभाग घेतला होता. 5 ते 15 ऑक्टोबरपर्यंत जोधपूर येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात मानसीने कर्नाटक आणि गोवा एनसीसी डायरेक्टोरेटचे प्रतिनिधीत्व करीत नेमबाजीत अव्वल आली आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यातून 37 जणांनी शिबीरात सहभाग घेतला होता. बंगळूरात नुकतेच छात्रांचे आगमन झाल्यानंतर डायरेक्टोरेटचे कार्यालयीन उपसंचालक कर्नल राजू रंजन यांनी मानसीचे विशेष अभिनंदन केले.
अखिल भारतीय वायू सैनिक शिबीर हे एनसीसी छात्रांसाठी विशेष करुन तयार करण्यात आलेला अभ्यासक्रमाचा भाग असून यात छात्रांना एव्हीएशनशी संबंधीत मायक्रोलाईट (लहान) विमान चालविणे, एरो मॉडलींग, नेमबाजी, पथसंचलन आणि वायू दलाशी संबंधीत इतर प्रशिक्षणाशी अवगत करून दिले जाते. छात्रांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो.
मानसी आरएलएस महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिकत असून तीला महाविद्यालयाच्या प्राचार्या शिला मेणसे, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष खासदार डॉ. प्रभाकर कोरे, 8 कर्नाटक एनसीसी स्कॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर सी. आर. पुनाप्पा यांचे मार्गदर्शन लाभले. तीच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.मानसी ही दैनिक सकाळचे जाहिरात व्यवस्थापक उदय होनगेकर यांची कन्या तर समिती नेते टी के पाटील यांची नात आहे.