महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक राज्योत्सवदिनी काळा दिन पाळते, ही मोठी चूक आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले.बोम्मई यांच्या वक्तव्याने मराठी भाषिक जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आता समिती याला प्रत्त्युत्तर काय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ज्या राज्यात राहतात तेथेच काळा दिन पाळायचे हे काही बरोबर नाही.अधिकाऱ्याकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाबाबत माहिती मागवली आहे.यापूर्वी देखील बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील समितीच्या काळ्या दिनाबाबत जी काही कारवाई करायची ती केलेली आहे.आता देखील पोलीस अधिकाऱ्याकडून अहवाल आल्यावर लगेच योग्य ती कारवाई करणार आहे.कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील पाण्याच्या वादावर तोडगा निघत आहे.मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री याबाबत महाराष्ट्राशी बोलणी करून योग्य निर्णय घेणार आहेत असेही बोंमाई म्हणाले.
युवा समितीने केला निषेध
गृह मंत्र्यांच्या वक्तव्याचा युवा समितीने निषेध व्यक्त केला आहे.कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी जे वक्तव्य केलय त्याचा आम्ही निषेध करतो. चूक की बरोबर हे बोलण्याआधी त्यांनी जाणून घ्यावं की काळा दिन का पाळला जातोय, गेली 64 वर्षे हा लढा का जिवंत आहे. आम्ही कुठल्या भाषेचा, जाती-धर्माचा, कुठल्या राज्याचा विरोध करत नसून आमच्यावर जो अन्याय भाषावार प्रांतरचनेच्या नावाखाली केंद्राने केलाय त्याविरुद्ध लढतोयअसें युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी म्हटलंय.
जिथं लोकशाहीची पायमल्ली केली जाते, घटनेने दिलेले अधिकार आमच्याकडून हिरावून घेतले जातात, बहुसंख्य असून अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी लढावं लागत, आमचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांनी आमचे अधिकार आम्हाला मिळवून द्यावे मग बोलावं. काळा दिन पाळला जात होता आणि आम्हाला न्याय मिळे पर्यंत पाळला जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असेही ते म्हणाले.