चन्नम्मा सर्कल होऊन धर्मवीर संभाजी चौकाकडे येणाऱ्या एका टोइंग आयशर वाहनातील चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. वाहन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान या अपघातात एक बुलेट चालक बालबाल बचावला आहे तर विशेष करून शाळा सुटल्यानंतर हा अपघात घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवानेच असे काही घडले नाही.
शानभाग हॉटेल समोर दुपारी हा अपघात घडला आहे. टोइंग चालक दस्तगीर खतालसाब बेपारी वय 58 असे त्या दुर्दैवी हृदयविकाराने मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान शानभाग हॉटेल समोर आल्यानंतर उमेश डुकरे नामक बुलेट चालक आपले वाहन घेऊन पेट्रोल पंप कडे जात असताना इकडून येणारे वाहन आपल्याच अंगावर येणार आहे, या भीतीने त्याने आपले बुलेट सोडून बाहेर उडी मारले. त्यामुळे तो बालंबाल बचावला आहे.
कित्तूर चन्नम्मा सर्कल वरून संभाजी चौकाकडे जाताना शानभाग हॉटेल समोर उमेश डुकरे आपली बुलेट घेऊन थांबला होता. तर बेपारी हे के 22b 29 93 घेऊन धर्मवीर संभाजी चौकाकडे चालले असताना त्यांना अचानक हृदयाचा झटका आला. त्यामुळे उमेश यांच्या अंगावरचे वाहन जाणार अशी भीती असताना त्यांनी वाहन सोडून बाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव बचावला आहे.
हा प्रकार काहींनी पाहिल्यानंतर त्यांनी थेट टोइंग वाहनाकडे धाव घेतली. यावेळी जाब विचारणार इतक्यात बेपारी यांची परिस्थिती पाहून तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यु झाला हा सारा प्रकार धक्कादायक असून जर शाळा सुटण्याच्या वेळी प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडले असते. त्यामुळे सुदैवानेच यामध्ये कोणालाही इजा पोचली नसून बुलेटचे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.