नवीन औद्योगिक धोरण अंमलात आणण्यासाठी सगळी तयारी झाली आहे.उत्तर कर्नाटकात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि उद्योगवाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल असे आश्वासन अवजड आणि मध्यम उद्योगखात्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी उद्योजकांच्या बैठकीत दिली.
बेळगावच्या उद्यमबाग या औद्योगिक वसाहतीला शेट्टर यांनी भेट देऊन पाहणी केली.त्यानंतर उद्योजकांशी त्यांनी चेंबरच्या सभागृहात उद्योजकांशी संवाद साधला.उद्यमबाग परिसराची पाहणी करून त्यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या.
उद्यमबाग येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यासह अन्य पायाभूत सुविधा त्वरित पुरविण्यात येतील.उद्योजक महानगरपालिकेला कर मोठ्या प्रमाणावर देतात त्यामुळे महानगरपालिकेने देखील येथे सुधारणा करण्यासाठी सहभागी होणे आवश्यक आहे.सहा कोटी रू च्या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येईल असेही शेट्टर म्हणाले.
लवकरात लवकर एक खिडकी योजना अंमलात आणून उद्योगाशी संबंधित अर्ज त्वरित निकालात काढण्याच्या सूचना शेट्टर यांनी दिल्या.केंद्राकडून मंजुरी मिळण्याच्या प्रकल्पांची माहिती उद्योजकांनी दिली तर त्यांना मंजुरी मिळण्यासाठी मार्गदर्शन ,सहकार्य केले जाईल असेही शेट्टर म्हणाले.
याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केंद्र सरकारकडून उद्योगांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकने उद्योजकांना सबसिडी द्यावी अशी मागणी उद्योजकांनी निवेदनाद्वारे मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे केली.यावेळी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी, मनपा आयुक्त जगदीश के एच उपस्थित होते.प्रारंभी श्रीशैल उप्पीन यांनी उपस्थितांचे स्वागत केले.