शहर परिसरात चायनीज मांजा अडकल्याने जखमी होणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. सोमवारी पतंगाचा मांजा अडकून मोटार सायकलवरुन जाणारा एक तरुण व दहा वर्षांची एक बालिका जखमी झाली आहे. सोमवारी हा प्रकार निदर्शनास आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सायंकाळी गांधीनगर ब्रिजवर ही घटना घडली आहे. सुरेश कंटेन्नवर (वय 20), मंगल उर्फ तनिषा पाटील (वय 10, दोघेही रा. कोंडसकोप) अशी जखमींची नावे आहेत. मंगलच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. तर सुरेशवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. नातेवाईकांना भेटून कंग्राळी खुर्दहून कोंडसकोपला जाताना सदर घटना घडली आहे. ही घटना गंभीर असून याबाबत चायनीज मांजा वर बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सुरेश, मंगल व त्यांचे आणखी एक नातेवाईक कंग्राळी खुर्द येथील असणाऱ्या त्यांच्या आजीकडे गेले होते. ते परत कोंडूसकोपला जाताना सुरेश च्या ओटा खाली मांजा लागला. त्यावेळी त्याने गाडी नियंत्रणात करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पाठीमागे बसलेल्या मंगलच्या हाताला संपूर्ण मांजा गुंडाळल्याने ती पूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत अत्यवस्थ झाली. ही घटना गंभीर स्वरूपाचे असून पतंग उडवणाऱ्या इथून पुढे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात श्रीनगर गार्डन जवळ एक महिला तर खानापूर रोडवर मच्छे येथे एक डॉक्टर असे अनेक जण पतंगाच्या चायनीज मांजा अडकल्याने जखमी झाले होते.शहर परिसरात अनेक ठिकाणी चायनीज मांजाची विक्री होत आहे पोलीस प्रशासनाने या धोकादायक मांजा विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी होत असताना पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे.मागील वेळी अधिकाऱ्याने मांजावर बंदी घातली होती. बेळगावात विविध ठिकाणाहून मांजर जप्त करण्यात येत होता. आता पुन्हा अशी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून याकडे गांभीर्याने लक्ष देणे सोयीचे ठरणार आहे.