भरधाव कारची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जण ठार झाले. तर चौघे जण जखमी झाल्याची घटना संकेश्वर येथे काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पूणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजिक सर्व्हिस रस्त्यावर हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती तायाप्पा आप्पासाहेब लिंगोजी (वय 27 रा. मड्डी गल्ली, संकेश्वर) व किरण शंकर सुतार (वय 33 रा. ताशिलदार गल्ली, संकेश्वर) अशी अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर सुनील शिवानंद कांबळे, प्रवीण नारायण बेविनकट्टी, गजानन परप्पा कुत्रे व अमित रामचंद्र कटावकर अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
मुलगा झाल्याच्या आनंदात तायप्पा याने मित्रांना गुरुवारी रात्री पार्टी दिली. यावेळी जेऊन घरी परतत असताना कार चालवणाऱ्या सुनील कांबळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पंधरा दिवसापूर्वी तायप्पा याच्या पत्नीची प्रसूती होऊन मुलगा झाला होता, अद्याप तायप्पाने मुलाचे तोंडदेखील पाहिले नव्हते. मात्र दुर्दैवाने झालेल्या अपघातात जन्मदात्या मुलाचे तोंड बघायच्या अगोदर वडिलांचा मृत्यू झालाय.