खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. यावर्षीच्या एक नोव्हेंबर च्या काळा दिनी मुंबई येथे धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण छेडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला जाणार आहेत त्यासाठी आतापासूनच नियोजन हाती घेण्यात आले आहे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसह जनतेचे सीमाभागातील कर्नाटकाच्या जोखडात खितपत पडलेल्या मराठी भाषिकांच्या व्यथा व वेदनांकडे लक्ष वेधण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रस्थित सीमावासीयांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्याध्यक्ष यशवंत बिरजे बोलताना म्हणाले सीमाप्रश्न हा केवळ सीमावासियांचा नव्हे तर महाराष्ट्राच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. या प्रश्नाची माहिती महाराष्ट्रातील जनतेला करून देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील जनतेने 1 नोव्हेंबर या दिवशी कडकडीत हरताळ पाळून कर्नाटक सरकारच्या अन्यायाचा निषेध नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.बैठकीला भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, अविनाश पाटील, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, पुंडलिकराव चव्हाण, जयराम देसाई, आबासाहेब दळवी, विशाल पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, तातोबा पाटील, अमृत पाटील आदी उपस्थित होते.