मार खाताना कळवळून आलेले अश्रुंचे उमाळे,गालावरून ओघळत असतानाही शेतवाडीत राबून घट्टे पडलेल्या हातावर पडणाऱ्या काठ्या झेलतानाही, अंगावरील साधा भोळ्या,कधी फाटलेल्या कपड्याचीही तमा न बाळगता,रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरतानाही, वयाने विझलेल्या डोळ्यात घोषणेने चमक उठणारी जीर्ण चिर्ण चेहरे. वर्षानुवर्षे आपल्या पाठीवर पडलेल्या वळांचे बळही सांगणारे वृद्ध.निराश न होता लढणारी ही’मराठी जनता’. मनात ध्यानात एकच उर्मी ‘महाराष्ट्रात’ जायचच!!
महाराष्ट्र एकीकरण समिती ही राजकीय संघटना आहे असं कुणी म्हटलं, तर ते चूक आहे. समिती म्हणजे आत्मप्रेरणेने प्रेरित होऊन, आत्मसन्मानाच्या लढ्यात उतरलेल्या लढाऊ लोकांचा मेळा आहे.इथे येणारा कुणी गरीब नाही,श्रीमंत नाही.इथं वयाचं बंधन नाही,कोणत्याही सामाजिकस्तराचे स्तोम नाही फक्त आहे तो एकच ध्यास संयुक्त महाराष्ट्राचा.हेच त्याचे क्वालिफिकेशन.
गेली 60 वर्षे हा लढा निरंतर चालू आहे. कैक लोकांच्यावर दावे दाखल झाले आहेत.अनेकांच्या हातापायांची पोलिसी लाठ्या खाऊन हाडे मोडली आहेत. डोकी फुटली आहेत .ही मराठी माती त्यांच्या रक्तात मळली आहे. तरुणीताठी पोरं घरातून पोलीस फरफटत नेत असताना पाठीमागे उठणारा आंतडं पिळवटून टाकणारा आक्रोश. घरातील कर्ते पुरुष तुरुंगात असताना हिंमतीने घरातील चूल पेटवणाऱ्या भगिनी. हा समितीचा संसार आहे.मराठी माणूस पोलिसी अत्याचाराने हरला नाही, डरला नाही किंवा विझलाही नाही.तर अधिक तेजाने पेटून उठला. जगाच्या इतिहासात ‘मराठी’माणूस लढाऊ म्हणून नोंद आहे, आणि ह्या पूर्व संचितला मराठी माणसाने कधीही बट्टा लागू दिला नाही.तो लढत राहिला,झुंजत राहिला अधिक प्रखरपणे तेजस्वी होत राहिला. पण…
सीमा लढा जसजसा प्रखर होत गेला, तश्या राजकीय पक्षांच्या हावरट नजरा एकसंघ लढणाऱ्या या लढाऊ एकीकडे गेल्या. त्यांनी आमिषे दाखवून,पदाची प्रलोभने दाखवून समितीतल्या ‘मावळ्यांना’ आपल्या कडे खेचायला चालू केलं, समितीचे काही चिरे हालायला लागले, तटबंदीतील बुलंद पणा काही ठिकाणी ठिसूळ भासू लागला.कुठं कुठं पडझड होऊ लागली .समितीतील काही मोहरे त्यांच्या हाताला लागत होते,राजकीय पक्ष उन्मादी होत होते.वाकुल्या दाखवत होते. समितीला हिणवत होते पण समिती लढत होती ,जेवढे मावळे होते ते अधिक चिवट होत होते. त्यांच्या लढ्याला धार चढत होती. पोलिसी अत्याचार जितका तीव्र, तितका मराठी एल्गार अधिक असे समीकरण होत चालले आहे.आता तर सीमा प्रश्न शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे.परंतु आठवण येते त्या गेलेल्या लढाऊ बांधवांची एकेकाळी त्यांनी आपल्या गळ्याच्या घाटया तणावून दिलेल्या घोषणांची ,पोलिसांशी झालेल्या गनिमी काव्यात त्यांनी दाखवलेल्या खुमखुमीची,भगवा घेऊन केलेल्या जल्लोषाची. भावांनो तुम्ही लढलेल्या लढ्यात तुमचे बांधव अजूनही तसेच लढत आहेत. ही लढाई निकराची होत चालली आहे, उणीव आहे ती तुमचीच. आजही तुम्ही घेणारी जागा मोकळीच आहे,रंगुबाई पॅलेस मध्ये तुम्ही बसणारा कोपरा कोराच आहे.जत्ती मठातील दुर्गाई आजही तुमच्या पायरवाची आठवण काढत आहे.मराठा मंदिराची कमान तुमच्या स्वागतासाठी आतुर आहे ,मारुती मंदिरात तुमचा घुमलेला आवाज अजून ताजा आहे.
लढा चालूच आहे, दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जिंकणार आपणच.ईच्छा आहे ती तुम्ही परत येण्याची ,समितीचा झेंडा हाती घेण्याची,तुमचं आमचं नात काय जय भवानी जय शिवराय,आपलं रक्त एक आहे ,आपला जोश एक आहे आपला घोष एक आहे तो ‘मराठी’.
समिती हा एक ‘लोकलढा’ आहे.लोकांनी उभारलेला,भावनिक गुंतवणुकीचा, मावळ्यांनो सर्वां बरोबर तुम्हीही होताच,कोण शिवाजी आहे, कोण तानाजी आहे कोण परशराम आहे ,आपण एकाच आईची लेकरं आहोत लढाईसाठी मनगटाला तुमचं बळ पाहिजे आहे. तुमची साथ हवी आहे.इतिहास पुजला जातो तो अस्मितेचा, आत्मगौरवाचा,स्वराज्याचा, या इतिहासाचा भाग होण्यासाठी परत या…आपलं आयुष्य सुवर्ण अक्षराने लिहून घ्या.समितीचा वट वृक्ष तुमचाच आहे आपल्या फांद्या पसरून तो म्हणतो आहे
… ‘या पाखरानो परत फिरारे’
-गुणवंत पाटील साहित्यिक बेळगाव