बीम्स आणि सिविल हॉस्पिटल मधील अनेक गैरकारभार चव्हाट्यावर येत आहेत. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात आहे. त्यामुळे येथील प्रकार वाढत असून याकडे लक्ष कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तरी बीम्स मध्ये ठेकेदार तुपाशी आणि रखवालदार उपाशी अशी अवस्था झाली आहे. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास हे प्रकार वाढणारच आहेत. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
येथील रखवालदाराना नेमका किती पगार आहे याची माहितीच नव्हती. मात्र जेव्हापासून बिम्स प्रशासनाने धनादेशाद्वारे त्यांना पगार केल्यानंतर आम्हाला इतका पगार आहे, अशी माहिती पडली. याच काळात ठेकेदारांनी त्या पगारातील दोन हजार रुपये आपल्याला द्यावे नाही तर पगार होणार नाही अशी धमकी देऊन भ्रष्टाचार सुरू केला आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात आहे. त्यामुळे येथील भ्रष्टाचार फोफावत असून पालकमंत्र्यांनी ताकदीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
येथील रखवालदाराला आठ तासाची ड्युटी आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 तास काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत ठेकेदाराने मात्र चंगळ केली आहे. रखवालदार यांच्या नावावर दर महिना तीन ते चार हजार रुपये करण्यातच धन्यता मानत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून भ्रष्टाचाराला आळा कधी बसणार, असा प्रकार सुरू असल्यास याकडे लक्ष कोण देणार? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
सिविल हॉस्पिटल व बीम्समध्ये सुमारे 70 हून अधिक रखवालदार हवे आहेत. मात्र ठेकेदाराने केवळ तीस ते पस्तीस रखवालदार ठेवून त्यांच्या आर्थिक पिळवणूकी बरोबरच मानसिक त्रास देण्यास सुरू केला आहे. सध्या या झालेल्या पगारामध्ये दोन हजार रुपये संबंधित ठेकेदाराला देणे बंधनकारक केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे ठेकेदार तुपाशी आणि रखवालदार उपाशी अशी अवस्था होऊन बसली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावा अशी मागणी होत आहे.