बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी उभारण्यात आलेली विधिमंडळाची सुवर्ण सौध ही इमारत पांढरा हत्ती म्हणूनच ओळखली जात आहे.यावर्षी सौधचा वापर कमीत कमी झाला आहे त्यामुळं पांढरा हत्ती म्हणून सौधची झालेली ओळख आणखी गडद होत चालली आहे.
450 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीचा गेल्या नऊ महिन्यात केवळ तीन दिवस वापर करण्यात आला आहे.यापैकी दोन दिवस जिल्हा पंचायत सीईओ बैठकीसाठी आणि एक दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बैठक झाली आहे.
या बेळगावातील पांढऱ्या हत्तीला महिन्याला वीस लाख रुपये केवळ देखभालीसाठी खर्च होतात.उत्तर कर्नाटकला महत्व मिळण्यासाठी बंगलोरची काही मुख्य कार्यालये येथे हलविण्यात येणार होती पण तसे काही झाले नाही.बंगळुरूची कार्यालये सौध मध्ये स्थलांतरित करा यासाठी अनेकदा आंदोलन झाले मात्र सौध मध्ये काही कार्यालये आली नाहीत.
यावर्षी पूर आल्यामुळे येथे 2012 पासून होणारे हिवाळी अधिवेशनही रद्द झाले आहे.हिवाळी अधिवेशनाचा विचार केला तरीही वर्षात केवळ बारा दिवस सुवर्ण सौधचा वापर केला जातो.त्यामुळे सुवर्ण सौध ही इमारत केवळ पांढरा हत्ती बनून राहिली आहे.केवळ बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठीच ही इमारत बेळगाव मध्ये उभारली आहे हे देखील सौधच्या कमी वापराने स्पष्ट होत आहे.