बेळगाव जिल्ह्यात सहकारी पत संस्था अनेक आहेत, त्यातील बऱ्याचशा संस्था या चेअरमन आणि संचालकांच्या गैरकरभरामुळे डबघाईला आलेल्या आहेत. याला तेथील संचालक मंडळ जबाबदार तर आहेच शिवाय कर्मचारी वर्ग , तसेच सहकार खाते व लेखा परीक्षण करणारे अधिकारी जबाबदार आहेत .
गेल्या काही वर्षात सोसायटीचे ठेवीदार संकटात सापडले असून नैराशेतून आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत.काही वेळेला ते मानसिक रुग्ण बनले आहेत. ठेवीदार आत्महत्या व हृदयविकाराचे बळी पडत आहेत .काही सोसायट्यांचे चेअरमन आणि संचालकांनी देखील गफला झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत.
भुदरगड पतसंस्थेच्या संचालकांने देखील रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हितसंबंध जपण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी पत न बघता देण्यात येणारे कर्ज व ठेवींवर देण्यात येणारे भरमसाठ व्याज,भेटवस्तू याला कारणीभूत आहे.यालाही संचालक मंडळा बरोबरच, बेनामी कर्जदार व सहकार खाते जबाबदार आहे.
सहकार खात्याने वेळीच वेसण घातली असती तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती.सहकार खाते आणि पतसंस्था यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळेच सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत आहेत.आयुष्यभर राबून कमावलेली पुंजी भ्रष्ट संचालक मांडल्यामुळे प्रामाणिक ठेवीदाराला गमवावी लागत आहे.
सोसायट्या बुडल्यामुळे अनेकांची लग्ने मोडली आहेत.अनेकांना आपली घरेदारे विकून न घेतलेले कर्ज भरावे लागण्याची देखील उदाहरणे आहेत.आशा कारभारामुळे सहकार क्षेत्रच मोडीत निघण्याची वेळ आली आहे.