आंबेवाडी येथील पर्यावरणप्रेमी युवकांनी एकत्र येऊन प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य दान उपक्रम राबविला आहे.गणेशोत्सव काळात आणि नंतर निर्माल्य मोठ्या प्रमाणावर नदी,विहिरी,तळी, ओढे यामध्ये विसर्जन केले जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होते.
विसर्जन घाटावर नदी पात्रात निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे प्रदुषण होते. हे प्रदुषण टाळण्यासाठी ‘निर्माल्य दान’ उपक्रम राबविण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये, नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात या उद्देशाने आणि नदी पात्रात पडणारे निर्माल्य रोखण्यासाठी व गोळा करण्यासाठी तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा संदेश आंबेवाडीच्या युवकांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
कोणत्याही घाटावर निर्माल्य दान हा उपक्रम राबवून निर्माल्य जमा करण्यात आले पाहिजे. निसर्गाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हेच आवाहन आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तरी सर्वानी निर्माल्य दान करुन सहकार्य करावे असे आवाहन विनायक तरळे,विनोद भांदूर्गे ,महेश तरळे, सूरज मन्नोळकर ,विनायक बायान्नाचे या पर्यावरणप्रेमी युवकांनी केले आहे.