बेळगाव-पणजी महामार्गावरील इदलहोंड फाट्यावर लांब पल्ल्याच्या बस थांबविल्या जात नसल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी (ता. १६) सकाळी घडली.
यामध्ये खानापूर आगाराच्या खानापूर-कलबुर्गी बसच्या मागच्या आणि पुढच्या बाजुच्य काचा फुटल्या असून दगडफेकीवेळी प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. बससेवा विस्कळीत झाल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांत संतापाचे वातावरण असून आज त्याचा अशाप्रकारे उद्रेक झाला.
O
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून हलशी, बिडी, नंदगड येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलने केली होती. महामार्गावरील अनेक गावांच्या फाट्यावर बसगाड्या थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे बेळगावला महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. दररोजच्या या प्रकाराला विद्यार्थी कंटाळले आहेत. इदलहोंड परिसरातील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी आणि कामगार बेळगावला जातात, पण खानापूर आगारासह इतर आगारांच्या बस थांबविल्या जात नसल्याने त्यांना वेळेत पोहचता येत नाही. यासंदर्भात आगारप्रमुखांना वारंवार निवेदने देऊनही ही समस्या सुटत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केली.
ही घटना घडताच आगारप्रमुख चंद्रशेखर लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. बस थांबणार नसतील तर महामार्गावरून एकही बस धावू देणार नाही, असा इशारा त्यांनी देताच हडबडलेल्या आगारप्रमुखांनी चालकांना बस थांबविण्याची सूचना केली जाईल अशी ग्वाही देत या प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान, दगडफेकीमुळे बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली. दुसऱ्या बसची व्यवस्था करून त्या सर्व प्रवाशांना बेळगावला पाठविण्यात आले. अद्याप याबाबत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.परंतू, आगारप्रमुखांनी त्यासाठी हालचाली चालविल्याचे समजते.