सध्या बेळगाव शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कामे अत्यंत मंदगतीने होत असून त्या कामांचा दर्जाही सुमार आहे.स्मार्ट सिटी योजनेतील कामावर कुणाचीच देखरेख नाही की वचक नाही अशी स्थिती झाली आहे.स्मार्ट सिटीची कामे जनतेच्या मुळावर उठतात काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.सगळीकडेच स्मार्ट कामे अर्धवट राहिली आहेत.त्यामुळे जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
नेहरू नगरमध्ये स्मार्ट योजनेत रस्त्याचे काम सुरू आहे पण ते अर्धवट सोडण्यात आले आहे.गटारीसाठी खणण्यात आले असून अद्याप गटारींचे काम पूर्ण झालेले नाही.अनेक ठिकाणी विजेच्या तारा, टेलिफोन तारा बाहेर आलेल्या असून ही स्थिती धोकादायक आहे.जनतेला यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेचे माजी संचालक डॉ दिनेश नाशीपुडी यांनी तर स्मार्ट सिटी योजनेच्या सगळ्या कामात गोलमाल असल्याचा आरोप केलाय.कामासाठी निकृष्ट प्रतीचे साहित्य वापरले जात आहे.एस जी बाळेकुंद्री रस्त्याचे कामही संथ गतीने चालले असून एका बाजूचे काम संपले आहे.
त्यामुळे एकाच बाजूने दोन्हीकडची वाहतूक सुरू आहे.तेथील परिसरात शाळा असून विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करतात.त्यामुळे हे काम लवकर संपवण्याची गरज आहे.स्मार्ट सिटी योजनेची कामे करणाऱ्या कंत्राटदारवर कोणाचाच वचक नसल्यामुळे मनमानी पद्धतीने काम चालले असल्याचा आरोप नाशीपुडी यांनी केला आहे.