केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केंद्राने राज्याला अद्याप पूरग्रस्तांसाठी निधी मंजूर केला नाही याबद्दल पत्रकार परिषदेत एक चकार शब्द न काढता चक्क मौन बाळगले.
पत्रकारांनी केंद्राने पाहणी करूनही अद्याप निधी दिला नसल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सोईस्करपणे मौन बाळगले आणि देशातील सोळा राज्यात पुराचा फटका बसला असल्याचे सांगून विषयांतर करण्याचा प्रयत्न केला.राज्यातील 28 पैकी 25 जागांवर जनतेने भाजपला निवडून दिले आहे याचे स्मरणही पत्रकारांनी अंगडी यांना करून दिले.तरीही अंगडी यांनी चकार शब्द काढला नाही.
केंद्रच्या अखत्यारीतील सीबीआय आणि ईडी सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास दिला जात आहे असेही पत्रकारांनी विचारले.त्यावेळी सुरेश अंगडी यांनी वाजपेयींचे केंद्रात सरकार असताना आपल्यावर आयकर धाड पडली होती असे सांगितले.केंद्रीय तपास यंत्रणांना स्वातंत्र्य असून कोणाच्याही दबावाखाली त्या काम करत नाहीत असे अंगडी यांनी सांगितले.