Friday, January 3, 2025

/

निवडणूक काळात गोवा कर्नाटक महाराष्ट्र पोलीस राखणार समन्वय

 belgaum

शांततापूर्ण, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी सीमा भागातील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा. विशेषत: सीमा भागातून अवैध दारू,शस्त्रे,पैसा आणि मतदानादिवशी बोगस मतदार येण्याची शक्यता लक्षात घेवून सुरूवातीपासूनच दक्ष राहून कारवाई करावी, असे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी आज दिले.*

पोलीस अधीक्षक कार्यालयातील परिषद सभागृहात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या अध्यक्षतेखाली आणि बेळगावचे विशेष पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सीमा भागातील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची सीमा परिषद झाली. या परिषदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश निकम, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून,सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा,सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, बेळगाव पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, चिक्कोडीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मिथुन कुमार आणि निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून संगणकीय सादरीकरण केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत बेळगाव-गोवा-सिंधुदुर्ग-कर्नाटक या राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा असून या ठिकाणी 14 तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत. तिलारी,फोंडा घाट तसेच कर्नाटक आणि गोवा या मार्गे प्रामुख्याने गुटखा, दारू आणि अवैध शस्त्रे येण्याची शक्यता गृहीत धरून तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.

यानंतर अन्य पोलीस अधीक्षकांनीही सादरीकरण करून तयारीबाबत माहिती दिली.

*हवाला ऑपरेटरवर लक्ष ठेवा- राघवेंद्र सुहास*
बेळगावचे विशेष पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास* यावेळी म्हणाले, सांगली, कोल्हापूर, कर्नाटकमधील नुकत्याच ओसरलेल्या महापुरात पोलीस दलाने समन्वय ठेवून खूप चांगल्या पध्दतीने काम केले आहे. गणेशोत्सवामध्येही कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. त्याबद्दल सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. विधानसभा निवडणुकीतही बेळगाव,विजापूर,चिक्कोडी या भागातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक करावाई करा. कोणतीही टोळी सक्रीय होणार नाही याची आपण काळजी घेवू. सीमा भागातील अवैध धंदे सुरू होणार नाहीत याची दक्षता घ्या. त्याचबरोबर हवाला ऑपरेटरवर लक्ष ठेवा. मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होणार नाही यावर कडक नजर ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

*विशेषत: दारू उत्पादनाची माहिती द्यावी- डॉ. सुहास वारके*
विशेष पोलीस महानिरीक्षक डाॕ सुहास वारके यावेळी म्हणाले, गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची आयात होण्याची शक्यता आहे. अशावेळी गोवा येथील पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यांकडून उत्पादनाबाबत माहिती घ्यावी. उत्पादन झालेला माल कोठे जातोय, याबाबतही माहिती घ्यावी. यामुळे अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या दारूवर लक्ष वेधता येईल. ही माहिती सीमा भागातील अधिकाऱ्यांना द्यावी. त्याशिवाय नजिकच्या पोलीस ठाण्यांबाबत संपर्क आणि समन्वय ठेवून अवैध पैसा, शस्त्रे यांच्यावर धाडी घालाव्यात. मतदाना दिवशी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सीमा भागातील नाक्यांवर संशयास्पद व्यक्तींकडील कागदपत्रांचीही तपासणी करावी. पोलीस दल सदैव सज्ज आणि सतर्क असते. महापूर,गणेशोत्सव या काळात खूप चांगले काम पोलीस दलाने केले आहे. त्याचपध्दतीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर बैठका घेवून सूचना द्याव्यात. येणारी निवडणूक निश्चितपणे निर्भय वातावरणात आणि शांततेत पार पाडाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.