यंदा पियुष हावळ या मराठी संस्कृती संवर्धनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याने मराठीच्या पाऊलखुणा जपणारा घरातील गणेशमूर्ती व देखावा केला आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र अस्तित्व (अभिजात) असण्याचे पुरातन पुराव्यांची प्रतिकृती ,जुन्नर जवळील 2223 वर्ष जुना नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील शिलालेख यात मराठीचा महाराठीनो असा उल्लेख सापडतो, तामिळ भाषेतील संगम साहित्यात देखील मराठी लोकांचा व भाषेचा उल्लेख सापडतो जो 2600 ते 2300 वर्ष जुना आहे.
प्राकृत मधील ( मराठीचे आद्य रूप ) 2000 वर्ष जुने मराठीतील आद्य ग्रंथ हाल सातवाहनांची गाथासप्तशती , प्राकृत मधील 80 हुन अधिक ग्रंथाची हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत जर इतक्या वर्षांपूर्वी एवढे साहित्य निर्माण झाले असेल तर आपली भाषा किती पुरातन आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो व मराठीची संपत्ती म्हणजे मराठीतील साहित्य या ठिकाणी मांडले आहे. कारण वर्षाला जवळपास 2500 पुस्तके मराठीत प्रकाशित होतात व मराठी इंग्रजी नंतर जगात दुसरी समृद्ध भाषा आहे.
इ स 983 चा श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायाशी असलेला शिलालेख श्री चावुंडराजे करविले। श्री गंगराजे सुत्ताले करविले.या शिलालेखाचा प्रतिकृती तयार करण्यात आली आहे यावरून भाषेचा पुरातन विस्तार लक्ष्यात येतो. मोडीलिपीतील ज्ञानेश्वरीतील ओळी. ओम् नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या , जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा . ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र प्रगल्भ मराठीतील आद्य ग्रंथ आहेत.या देखाव्याचे कौतुक होत आहे.