हवेत बॉम्ब उडविण्याच्या गणेशभक्तांच्या बेजबाबदारपणामुळे आणि हुल्लडबाजीमूळे एका वृद्ध पेपर विक्रेत्याला आपली दृष्टी गमवावी लागण्याची दुर्दैवी घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी घडली आहे.
एका अतिउत्साही गणेशभक्ताने बॉम्ब हवेत उडवला .तो बॉम्ब हवेत फुटला आणि त्याचे साहित्य वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात शिरले.महादेव कल्लाप्पा उचगावकर (८४),भांदूर गल्ली असे त्या वृद्ध पेपर विक्रेत्याचे नाव आहे.
महादेव हे कपिलेशवर ब्रिजखाली बसून पेपर विक्री करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील ते नेहमीप्रमाणे पेपर विकत बसले होते.त्यावेळी दुपारी एकाने हवेत बॉम्ब उडवला आणि बॉम्ब फुटून त्याचे साहित्य या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात शिरले.त्यामुळे डोळ्याच्या शिरा फुटल्या.लगेच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले.
नंतर त्यांना ऑपरेशन करण्यासाठी के एल ई इस्पितळात हलविण्यात आले.तेथे त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून डोळा काढून टाकण्यात आला.के एल ई इस्पितळात ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरना सांगून आमदार अनिल बेनके यांनी विशेष प्रयत्न केले.
दहा वर्षांपूर्वी अपघातात महादेव यांचा एक डोळा निकामी झाला होता.आता बॉम्बमुळे दुसरा डोळाही त्यांना गमवावा लागल्यामुळे त्यांचे जीवन अंधकारमय झाले आहे.अलीकडेच पूर आलेला त्यावेळी त्यांचे भांदूर गल्लीतील घर पडले होते.
घर पडलेला आघात ताजा असतानाच आता दृष्टी गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतीत झाले आहेत.अज्ञात गणेशभक्ताच्या बेजबाबदारपणा मुळे महादेव यांना दृष्टी गमवावी लागली आहे.आता गरज आहे ती डोळस गणेशभक्तांनी महादेव यांना दृष्टी मिळवून देण्यासाठी मदत करण्याची…