आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांना उरुग्वे मधील मॉंटेव्हिडीओ येथे आर्टिस्ट ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.वर्ल्ड ट्रेड सेंटरचे एक्झिक्युटिव्ह इन्व्हेस्टमेंट हेड मारियानो कोलाझो यांच्या हस्ते शानदार समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत विकास पाटणेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सध्या विकास पाटणेकर हे उरुग्वेच्या दौऱ्यावर असून तेथील विविध शहरात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आणि डेमॉनस्ट्रेशन सुरू आहेत.पुंता देल इस्टे येथे त्यांचे जलरंगाचे दोन दिवसाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.व्हरनिसेज आणि सोलानास येथेही त्यांच्या चित्रांचे दोन दिवसाचे प्रदर्शन झाले.
मॉंटेव्हिडीओ येथे देखील त्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते.यावेळी अर्जेंटिना,उरुग्वे आणि कोलंबिया मधील कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
उरुग्वेमध्ये झालेल्या त्यांच्या प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाला कलाप्रेमींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.उरुग्वे मधील अन्य शहरात देखील दि.१० सप्टेंबर पर्यंत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आणि प्रात्यक्षिके होणार आहेत.उरुग्वेच्या चॅनलने देखील त्यांच्या कला प्रवासाची माहिती देणारी खास मुलाखत घेतली आहे.