रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि लेकव्ह्यू फौंडेशन आयोजित मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 3000 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता.
सीपीएड मैदानातून सकाळी 6 वाजता मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद, सुनील जोशी, जे. एल. विंगचे मेजर जनरल अलोक कक्कर, सीआयजेडब्ल्यू स्कुल, आयटीबीपीचे हरींदरपाल सिंग तसेच श्रीनिवास मुर्ती यांनी बावटा दाखवून मॅरेथॉनला चालना दिली. या मॅरेथॉनमध्ये बाळ गोपाळांसह वयस्कर धावपटूंनी सहभाग घेतला होता.
कु. प्रेम यल्लाप्पा बुरुड या कावळेवाडीच्या 8 वर्षे 7 महिन्याच्या चिमुकल्या धावपटूंने मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन 5 कि. मी. चे अंतर 21 मिनिटे 5 सेकंदात पूर्ण करून टाळ्या मिळविल्या. या छोट्या धावपटूला त्याचे वडील यल्लाप्पा बुरुड व नावाजलेले प्रशिक्षक लक्ष्मण कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
माहेश्वरी अंधशाळेतील 13 मुलां- मुलींनीही मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन 5 कि. मी. चे अंतर पूर्ण केले. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, क्रीडा शिक्षक शिरीष सांबरेकर व मल्लप्पा के. यांचे मार्गदर्शन आणि प्रशासकीय मंडळाचे प्रोत्साहन लाभले आहे.
तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये तरुणांसोबत वयस्कर धावपटूही धावले. भैरू शिवाजी पाटील (73), सुरेश देवरमनी ( 67), डी. जी. शिंदे (73), बाळाप्पा माणिकेरी (56), गोव्याचे वेंकटेश देसाई (56) या वयस्कर धावपटूंनी मॅरेथॉनचे अंतर कापत तरुणांनाही लाजविले. 73 वर्षीय भैरू पाटील यांनी 45 वरील वयोगटातील तरुणांसोबत धावत 5 कि. मी. अंतर 33 मिनिटात पूर्ण करून या गटात दुसरा क्रमांक मिळवित तरूणांना अवाक केले. मी दररोज 5 ते 6 कि. मी. चालतो. चालण्याच्या या सरावामुळेच मी मरेथॉनचे हे अंतर कापले असे सांगत त्यांनी तरुणांना रोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
सावर्डे- गोवा येथून आलेल्या वेंकटेश देसाई या 56 वर्षीय धावपटूंनी 1 तास 58 सेकंदात 21 कि. मी. अंतर पूर्ण केले. यावेळी बोलताना त्यांनी आयोजनाबद्दल प्रशंसा केली. तसेच मॅरेथॉन मार्ग व्यवस्थित असल्याने धावण्यास अडचण आली नाही असे म्हटले.
काही महिन्यांपूर्वीच हृदय शस्त्रक्रीया झालेल्या झिपर्स क्लबच्या सदस्यांनीही मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन वाहवा मिळविली.
स्पर्धेत पुरुष गटात चंदन कुमार, राहुल पाटील, एस. बी. गल्ले, महाकुटेश्वर मोशी, प्रदीप पाटील, राजू पाटील, राजेश कोंजार, अजित कामत, डॉ. विनायककुमार पाटील यांनी तर महिला गटात श्रुष्टी अरुण पाटील, शिल्पा, क्लेफा डायस, संचिता पाटील, सुमिथा रुतोंजी, प्रतिमा हेबळे, राजेश्वरी बालोजी यांनी आपापल्या गटात पहिला क्रमांक मिळविला.
स्पर्धेनंतर विजेत्यांना डॉ. शशिकांत कुलगोड , महेश अनगोळकर, आनंद सराफ, अविनाश पोतदार, गिरीश सोनवाळकर, राजेशकुमार तळेगाव, के. एल. कुलकर्णी, विनायकुमार बाळीकाई, उमेश रामगुरवाडी, कुलदीप हंगीरगेकर, डी. बी. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात बेळगाव जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंत्रे आणि सहकारी तसेच माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थी व उदय इंग्रजी माध्यम शाळेच्या बँड पथकाचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
अंकुश दोशी व सुषमा भट्ट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. शशिकांत कुलगोड यांनी आभार मानले.