बेळगाव तालुका परिसरातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मार्कन्डेय नदी पात्राला लागून असलेल्या गावात पाणी शिरून नुकसान होत आहे. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.आज जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी कंग्राळी खुर्द आणि आंबेवाडी भागातील पुरग्रस्थ विभागांची पाहणी केली.
तसेच पुराच्या वेढ्यातून आमच्या शेती आणि जनतेला वाचव अशी प्रार्थना नदीकडे व पावसाकडे करून गंगापूजनही केले. यावेळी सरस्वती आली पण लक्ष्मी कुठे बेपत्ता झाली अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसुधारणा समितीचे अध्यक्ष आर आय पाटील, चेतक कांबळे, शिवाजी राक्षे, मल्लाप्पा सांबरेकर आदींसह सरस्वती पाटील यांनी पाहणी दौरा केला. प्रारंभी गंगापूजन करण्यात आले. मार्कन्डेय नदीचे गंगापूजन करण्यात येत असताना नदी व पावसाला जनतेस धोक्यात घालू नकोस अशी विनंती करण्यात आली. तब्बल 40 वर्षांनी असा पूर आल्याची भावना शेतकरी आणि ग्रामस्थांनी बोलवून दाखवली.
आंबेवाडी येथे 5 घरे पडली आहेत. मन्नुर परिसरातही नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी . बेळगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्थानाही दिलासा द्यावा अशी विनंतीही सरस्वती पाटील यांनी यावेळी केली.शुक्रवारी सायंकाळी पासून आंबेवाडी मन्नूर गावचा संपर्क तुटला असून रस्त्यावर पाणी आले आहे याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. मार्कन्डेय नदीचा रौद्र रूप कित्येक वर्षांनी पहायला मिळाला आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी देखील मागणी होत आहे.