श्रावण महिना हा श्रद्धा असणाऱ्यांसाठी अतिशय पवित्र महिना समजला जातो. ह्या महिन्यात लोक श्रद्धेने महादेवाची पूजा करतात. उपवास ठेवले जातात. संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय लोक हा श्रावण महिन्याचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि मनोभावे साजरा करतात.
ह्या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. ह्या महिन्यात महादेवाला प्रसन्न केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा लोकांचा समज आहे.पण श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो तो म्हणजे मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे. हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यात मांसाहार करणे वर्ज्य ठरविण्यात आले आहे, म्हणजे ह्या महिन्यात मांसाहार करू नये असे सांगितले जाते.
आपल्या शास्त्रांमध्ये आहारासंबंधी अनेक नियम आहेत.
सात्विक आहार हा देखील त्यापैकीच एक नियम. जसे मांसाहार करणे हे आठवड्यातील काहीच दिवस चालते इतर दिवशी म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार ह्या दिवसांना मांसाहार करणे देखील वर्ज्य मानले जाते.
धर्मात वर्ज्य किंवा पवित्र ठरवली गेलेली गोष्ट आपण पाळतोच असं नाही. कोणत्या महिन्यात मांसाहार करायचा की नाही हे आपण स्वतः ठरवत असतो. तसे करणारा एक मोठा वर्गही आपल्याकडे आहे. धार्मिक श्रद्धा सोडून व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व द्यायला आपण शिकलो आहोत. हीच प्रगतीची नांदी असते.
काही मुठभर लोक तसे करण्याला विरोध करत असले तरी त्यांना फारशी किंमत दिली जात नाही.
मात्र, श्रावण महिन्यात हे धार्मिक नियम अधिक काटेकोर पद्धतीने पाळले जातात.पण ह्या श्रावण महिन्यातच मांसाहार करणे वर्ज्य का मानले जाते? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
श्रावण महिन्यात मांसाहार करू नये, ह्यामागे मुख्यतः धार्मिक कारणे आहेत.
पण त्याला अनेकदा विज्ञानाचा मुलामा दिला जातो. परंपरेला विज्ञानाशी जोडून पाहण्याचा आणि संबंध प्रस्थापित करता आलाच तर “ही परंपराच वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊन सुरु झाली होती” असे म्हणण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वीपासून आहे.या महिन्यात शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या लोकांकडून दिली जाणारी अशीच काही कारणे आपण पाहणार आहोत..
श्रावण महिना हा पावसाळा ह्या ऋतूत येतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते.श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मियांची परंपरा आहे.पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर असते. या काळात रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाण्यास आपण मज्जाव करतो ते ह्याच खराब वातावरणाच्या कारणामुळे. हेच कारण धर्मशास्त्रांनी देखील दिले आहे.
पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिय़ा वाढू शकत नाही. मात्र पावसाळ्यात हे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातला म्हणजेच श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो.
श्रावण महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी जडू शकतात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
म्हणजेच “श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो त्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे आरोग्य” असे त्यांचे मत असते.
श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ मानला जातो. ह्या काळात मासे तसेच इतर पशु, पक्ष्यांमध्ये गर्भधारणेची संभावना असते. कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते. तसेच कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने मानवाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या देखील उद्भवू शकतात.तसेच ह्या काळात मासे प्रजनन करत असल्याने जर मासे खाणं चालू ठेवले तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची देखील भीती असते. त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत, यासाठी श्रावणात मासे खाणं वर्ज्य मानले जाते.
श्रावणात मासे न खाण्याचे हे एक कारण वैज्ञानिक आहे असे म्हणता येईल.
पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. त्यामुळे पचनात व्यत्यय येऊ शकतो, हृदया संबंधी आजार होऊ शकतात, शारीरिक दुखणे उद्भवू शकते. त्यामुळे ह्या महिन्यात मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते.
तसेच श्रावण महिन्यात ब्रम्हचर्य पाळण्याचे देखील सुचविले जाते. म्हणजेच ह्या काळात शरीर सुख उपभोगू नये. ह्याचे कारण म्हणजे हा काळ गर्भधारणेच काळ असतो. पण ह्या महिन्यात स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात उपवास आणि पूजा-अर्चना करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, त्या कमकुवत होतात.
अश्या स्थितीत गर्भधारण करण्यासाठी त्या शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात, तसेच होणारे बाळ देखील शारीरिक दृष्ट्या कमकुवत असते. अश्या स्थितीत गर्भधारण करण्यासाठी त्या शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात, तसेच होणारे बाळ देखील शारीरिक दृष्ट्या कमकुवत असते. त्यामुळे ह्या काळात शरीर सुख उपभोगणे देखील वर्ज्य मानले जाते.अशी अनेक कारणे श्रावण महिन्यात घालून दिलेल्या ठराविक नियमांसाठी दिली जातात. त्यातील काही योगायोगाने वैज्ञानिक आहेत तर काहींचा विज्ञानाशी काही संबंध नाही.