कर्नाटकातील नव्या भाजपा सरकारने टीपू सुलतान जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कन्नड संस्कृती विभागाला यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. याची संपूर्ण राज्यात जोरात चर्चा सुरू आहे.
भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला होता. ‘कोडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते. या युद्धात कोडगु लोक शहीद झाले होते’, असे के. जी. बोपय्या यांनी पत्रात म्हटले आहे.
कर्नाटकात 2015 मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने भाजपाचा विरोध असताना टीपू सुलतान जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. आता काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन कर्नाटकातील राजकारण वातावरण तापले आहे.
या निर्णयाने मुस्लिम बांधव संतापले आहेत. भ्रष्टाचार मुक्त सरकार म्हणून भाजप ला आणि पंतप्रधान मोदींना पाठींबा देण्यात आता फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम बांधव सुद्धा आघाडीवर आहेत. अनेकांनी जाहीरपणे भाजप मध्ये प्रवेशही केला आहे. भाजप धर्मांध नाही अशी प्रतिमा डोळ्यासमोर ठेऊन एक स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून आम्ही नरेंद्र मोदींना नेतृत्व दिले पण टिपू सुलतान जयंती रद्द करून कर्नाटकातील भाजप नेते आमची भावना दुखावत असून याकडे मोदीजी आणि अमित शहा यांनी लक्ष द्यावे अशी मागणी मुस्लिम समाज करीत आहे. अशी अनेक निवेदने सुद्धा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत.