सरकार स्थापन केले तरी आपले कॅबिनेट मंत्री मंडळ स्थापन करण्यात विलंब झालेल्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी अखेर राज्यपालांकडे आपल्या प्रस्तावित मंत्रिमंडळाचे पत्रक आणि यादी सादर केली आहे. 17 जणांची यादी सादर करण्यात आली आहे.
आज सकाळी साडेदहा वाजता राजभवन येथे या मंत्रांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे .बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांचा कॅबिनेट मंत्री मंडळात समावेश करण्यात आला आहे .
इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यातील सीनियर नेते उमेश कत्ती याच पद्धतीने भाजपचे भालचंद्र जारकीहोळी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा होती. या बरोबरच अनेक जण इच्छुक होते. आपल्याला मंत्रीपद मिळणार म्हणून काही नवीन आमदारही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते.
यावेळी भाजपमधील प्रत्येक जणच मंत्रिपदासाठी इच्छुक असताना 17 जणांची यादी तयार केली असून यामध्ये गोविंद कारजोळ, अश्वथ नारायण सी एन, के एस ईश्वराप्पा, आर अशोक ,जगदीश शेट्टर , बी श्रीरामलु, एस सुरेश कुमार, व्ही सोमन्ना, सिटी रवी, बसवराज बोंमाई, कोटे श्रीनिवास पुजारी, जेसी मधू स्वामी , चंद्रकांतगौडा पाटील, एच नागेश ,प्रभू चव्हाण यांच्या बरोबरीने लक्ष्मण सवदी व शशिकला जोल्ले यांची नावे आहेत.