उत्तर भागातील जीवनदायिनी म्हणून मार्कंडेय नदीकडे पाहिले जाते. मात्र काही अज्ञान नागरिकांकडून मार्कंडेच्या काठी कचरा फेकण्याची प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यंतरी महानगरपालिकेचा कचराही नदीपात्रात फेकून देण्यात येत होता. मात्र याला नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर तेथील कचरा हलविण्यात आला होता. हे प्रकार वारंवार घडत असताना आता नागरिकांकडून या ठिकाणी कचरा फेकून देण्यात येत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कडोली अलतगा आदी भागातील नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत असतात. मात्र घरातील कचरा नदीकाठी आणून ठेवण्यातच अनेकजण धन्यता मानू लागले आहेत. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. तर काही ग्रामस्थही या ठिकाणी कचरा फेकून नदीचे पावित्र्य धोक्यात आणत आहेत.
पहिलाच ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले असतानाच आता पुन्हा कचऱ्याची समस्या डोके वर काढू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेने पुढाकार घेऊन नदी काठावर कचरा टाकणाऱ्या दंड आकारावा अशी मागणी होत आहे.