बंदी असलेल्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाची आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी चांगलीच हजेरी घेतल्याची घटना रविवारी घडली आहे आमदार मॅडम ट्रक चालकाचा समाचार घेतेवेळीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खानापूर जांबोटी मार्गावरील शंकर पेठ चढतीजवळ मोरीला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जांबोटी कणकुंबी भागातील नागरिकांना पिरनवाडी मार्गे प्रवास करावा लागत आहे. असे असताना खानापूरहुन जांबोटीच्या दिशेने वाहतुकीला बंदी असलेल्या जत जांबोटी मार्गावरून अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी चांगलेच धारेवर धरले. मोरीचा एका बाजूचा कठडा पूर्णपणे कोसळला आहे.
कधीही रस्ता कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे तोपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून वाहने अडविण्याची सोय करण्यात आली आहे.
मात्र हा भराव ओलांडून सदर ट्रकचालकाने शंकर पेठ पुलापर्यंत ट्रक नेला होता. 30 ते 40 टन वजनाची वाहतूक या ट्रकमधून केली जात होती. आमदार डॉ निंबाळकर यांच्या निदर्शनास हा धोकादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी ट्रक चालकाची चांगलीच खरडपट्टी केली. ट्रक पुन्हा माघारी फिरव अन्यथा सर्व टायरमधील हवा सोडली जाईल अशी तंबी दिली. त्यामुळे अखेर ट्रक चालक आल्या मार्गाने माघारी फिरला.
गेल्या काही महिन्यांपूर्वी बेळगाव खानापूर मार्गावर धावणाऱ्या बस चालकाला अश्याच पध्दतीने मराठी स्टाईल दाखवली त्यानंतर पुन्हा एकदा हा ट्रक चालक त्यांच्या तावडीत सापडला होता.