खानापूर तहसीलदार कार्यलयात रोज येणाऱ्या मराठी भाषिकांच्या सोयीसाठी मराठीतूनही फलक लावा अशी मागणी करण्यात येत होती त्यानुसार खानापूर कार्यालयात मराठी फलक लावण्यात आला आहे. खानापूर तहसीलदार कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण बैठकीत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकार्यांना नियमानुसार मराठी भाषेचाही योग्य वापर करण्यात यावा अश्या सूचना दिल्या होत्या याची दखल घेत तहसीलदार कार्यालयात मराठीत फलक लावण्यात आले आहेत.
खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाषेच्या अडचणीमुळे शासकीय योजनांच्या लाभापासून गोरगरीब जनता वंचित राहण्याचा प्रकार घडतो. योजनांची माहिती सर्वसामान्यांना वेळेत कळावी. यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कन्नडबरोबरच मराठी भाषेतूनही माहिती व सूचना फलक लावावेत, अशी सूचना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली होती.
शहर व तालुक्यात शासकीय स्तरावर मराठी भाषेला डावलण्यात येत असल्याची बाब मराठी भाषिकांनी निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याची दखल घेत आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तहसीलदार कार्यालयात महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकार्यांना नियमानुसार मराठी भाषेचाही योग्य वापर करण्यात यावा अश्या सूचना दिल्या होत्या.या कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांश लोक मराठी भाषिक असल्याने त्यांना कन्नडमधील फलक वाचता येत नाहीत. त्यामुळे शासकीय योजना तसेच सरकारी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती समजत नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. त्याकरिता लोकांना समजेल अशा त्यांच्या सोयीच्या भाषेत सूचना फलक लावण्यात यावेत, असे अधिकार्यांना सांगितले होते .
अंजली निंबाळकर या काँग्रेस आमदार आहेत त्यांनी प्रयत्न करून खानापूर कार्यालयात मराठी फलक लावला आता बेळगावात देखील काँग्रेसच्या आमदार आहेत त्या मराठी कडे कधी लक्ष देणार?मराठी फलक बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात कधी लावतात का केवळ मतांसाठी मराठीचा वापर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.