अतिवृष्टीमुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पूरग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागले असतानाच सतत पडत असलेल्या पावसामुळे ज्योतिनगर येथील डोंबारी समाजाच्या लोकांच्या घराची पडझड झाली त्यामुळे ते बेघर झाले आहेत.त्यांची तात्पुरती व्यवस्था नजीकच्या प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.
इतरत्र सरकारी यंत्रणा पूरग्रस्तांना मदत करण्यात व्यस्त असताना ज्योतिनगर मध्ये घडलेल्या घटनेकडे पहाण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळच नाही आहे.ग्रामपंचायत सदस्य मौनेश्वर गरग यांनी सरकारी कार्यालयांत जाऊन झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकाने आपले हात झटकले.
लागलीच मौनेश्वर गरग यानी बेळगाव मधील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि पहाता पाहता ज्योतिनगर इथे मदतीसाठी अनेकांचे हात एकवटले.
जायंट्स मेन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,कॉलेज फ्रेंड्स सर्कल,धारवाड येथील सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक व्यक्ती आणि संघटनांनी ब्लॅंकेट, जमखाणे,साखर, चहापावडर, तांदूळ, तेल,बेसनपीठ, दुधाची पाकिटे, फळे, बिस्कीट अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यामुळे तात्पुरती व्यवस्था झाली असून माझ्यासारख्या ग्रामपंचायत सदस्याच्या आवाहनास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मौनेश्वर गरग यांनी सर्वच दानुशर व्यक्तींचे आभार मानले.