बेळगाव शहरात आज सगळीकडे दुहेरी संगम साधला जात आहे. बहिण आणि भावाच्या प्रेमाचा दिवस रक्षाबंधन आणि देशप्रेमाचा दिवस स्वातंत्र्यदिन या निमित्ताने होणारे झेंडावंदन असा माहोल आज शहरात आहे.
पारंपारिक कपडे घालून हातात तिरंगा ध्वज घेऊन लहान मुलांनी आज आपल्या शाळेच्या आवारात दाखल होऊन झेंडावंदन केले. शिक्षकवर्ग नोकरदार आणि इतर सारे जण आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन झेंडा वंदन करताना दिसून आले. यानंतर बहिणी भावाकडे जाऊन किंवा भावाने बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
सकाळी दहा पर्यंत सगळीकडे हाच माहोल पाहायला मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडे विक्रीबरोबरच रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी विक्रेत्यांनीही बाजारपेठ भरून गेली असून आपल्या भावाला बांधण्यासाठी सुंदरशी राखी निवडून त्यानंतर आपल्या भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणी दिसून येत आहेत.
तर संरक्षणाची हमी देतानाच बहिणीला सुंदरशी भेटवस्तू देण्यासाठी खरेदीसाठी बाहेर पडले असून त्यामुळे बाजारपेठेत गर्दी आहे. स्वातंत्र्यदिन आणि राखी बंधन असा संगम एकाच दिवशी आल्यामुळे यावर्षी सहली आयोजित करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
स्वातंत्र्यदिनाला बाहेरगावी सहलीला जाण्याचे प्रमाण या वर्षी कमी आहे. सहलीला जाण्यापेक्षा आपल्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात अनेक भाऊ गुंतले आहेत.