बेळगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शंभर फुटी तिरंगा ध्वज उभारला.
भारतीय रेल्वेने देशभरातील 75 रेल्वेस्थानके निवडली होती. यापैकी बेळगावच्या रेल्वे स्थानकाचा समावेश झाला असून आज या शंभर फुटी स्थंभवर तिरंगा फडकवण्यात आला आहे. म्हैसूर ब हुबळी याठिकाणी ह्या प्रकारचे भव्य आणि सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आले आहेत.
बेळगाव रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक परंपरा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या रेल्वे स्थानकाला भेट दिली होती. यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकाचे महत्व देशाला कळण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती मिळाली आहे. या शंभर फूट ध्वजावरील तिरंगा वीस बाय तीस फुटांचा आहे .15 लाख रुपये खर्च करून देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी उभारणी झाली आहे.
बेळगाव शहर परिसरात आता तीन उंच राष्ट्रध्वज झाले आहेत त्यापैकी एक हा बेळगाव रेल्वे स्थानकाचा ध्वज आहे.किल्ला तलावा वर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज तर सांबरा विमान तळावर देखील 100 फूट उंचीचा ध्वज या अगोदर बसविण्यात आला आहे.बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होत आहे या निमित्ताने हे अधोरेखित होत आहे.