शेतात भांगलण करतेतवेळी विद्युत खांब्यावरची तार तुटून पडल्याने मृत झालेल्या शेतकरी महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्याचे ठोस आश्वासन खानापूर हेस्कॉमचे सहाय्यक अभियंते एम बी पठाण यांनी दिले. बुधवारी सकाळी रुमेवाडी येथील शिवारात तहसीलदार शिवानंद उळळागड्डी यांनी पहाणी केली त्यावेळी हेस्कॉम अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले.
घटनास्थळी मयत शांता यांच्या दोन पैकी एका मुलाला नोकरी देण्याची मागणी केली असता आगामी आठ दिवसात पाच लाख रु.मदत देऊ असे आश्वासन देत तात्काळ अंत्यसंस्कार करण्यासाठी दहा हजार रुपये पीडित कुटुंबाला मदत दिली.
खानापूर रुमेवाडी येथील शेतवाडीत हेस्कॉमच्या बेजबाबदारपणामुळे शेतात काम करणाऱ्या शांता घाडी व त्यांच्या कुत्र्याचा बळी गेला होता.
मंगळवारी दुपारी घटना घडली असताना सायंकाळी सात पर्यंत शेतवाडीतील विद्युत पुरवठा चालूच होता मयत शांता यांच्या घरच्यांनी रात्री शेतात लांबूनच मयत कुत्र्याचा मृतदेह पाहिला. करंट सुरू असेल या भीतीने मात्र शांताच्या मृतदेहाजवळ जाणे टाळले होते. बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार ,पी एस आय बसनगौडा पाटील आदीनी पहाणी केली.
मयत शांता यांच्या बाजूच्या शेतात नऊ महिला भांगलण करत होत्या. त्यांना तुटलेली तार दिसली मात्र शांता यांचा मृतदेह दिसला नव्हता. दुपारी विद्युत पूरवठा सुरूच असल्याने त्या नऊ महिलानी जाणे टाळले होते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.एकूणच जुन्या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे .