नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे अधिकारी असल्याचे सांगून हलगा गावातील अंगणवाडी तपासणी करून दोन लाख रु.ची मागणी करणाऱ्या पाच जणाविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारी पोशाख परिधान करून नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे अधिकारी आहोत असे सांगत अंगणवाडीची पाहणी करून अरेरावी करणारे पाच जण पोलिसांचे पाहुणे झाले आहेत.
सोमवारी सूट,बूट घालून अगदी रुबाबात नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे अधिकारी आहोत असे सांगत पाच जण हलगा येथील अंगणवाडीत दाखल झाले.तेथील साहित्याची पाहणी करून दोन लाख रु.ची या पाच जणांनी मागणी केली.त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या पाच जणा विरोधात तक्रार दाखल केली.दोन लाखाची मागणी केल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
विशाल श्रीकांत दौलतकर (४६)रा.शहापूर,वासू तम्माण्णा रेवणकर(३२) रा.शास्त्रीनगर ,शंकर गुंडू काकतीकर(४०)रा.सदाशिवनगर,नागभूषण पांडुरंग अर्कसाली(३८),रा.शास्त्रीनगर आणि राहुल राजू दिवाकर (१९) रा.शास्त्रीनगर अशी
आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर ३४१,३८४,४२०,५०४,५०६,५११ कलमा अंतर्गत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांचीही चौकशी करा
एकीकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्याना पोलिसांनी गजाआड केले असले तरी दुसरीकडे अंगणवाडी शिक्षकांचा भ्रष्टाचार देखील बाहेर काढण्याची मागणी वाढू लागली आहे. हलगा येथील अंगणवाडी शिक्षिकांनी मोठ्या प्रमाणात लहान मूल आणि गरोदर महिलांना वाटप केले जाणारे धान्य साठवल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.