बेळगाव शहरातील नाले कोंडून आलेला पूर आता ओसरत आहे. या नाल्यामध्ये अडकून बसलेले प्लास्टिक आता बाहेर येत आहे. बेळगावचे नाले अतिक्रमणाने भरले हे पहिले सत्य आणि जास्तीत जास्त प्लास्टिक अडकणे हे दुसरे सत्य. पहिली समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.
दुसरी समस्या दूर करण्यासाठी नागरिकांनी भान ठेवायला पाहिजे. यापुढे तरी नाल्यात प्लास्टिक टाकणे धोकादायक आहे हे ओळखून ते टाळायला पाहिजे.
प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे प्रशासनाला शक्य झाले नाही. नागरिकांनी प्लास्टिक वापरणे आजवर थांबवले नाही. आणि ते प्लास्टिक थेट नाल्यात टाकण्याचे प्रमाण काय कमी झाले नाही. आज पुराचे पाणी कमी झाल्यावर शिल्लक राहिले आहे ते कचऱ्यात अडकलेले प्लास्टिक.
यंदा पावसाळ्यापूर्वी मनपाने नाले किती स्वच्छ केले हे सुद्धा पाऊस आणि पाण्याने दाखवून दिले आहे. यापुढे तरी मनपा आपले काम योग्य करेल आणि नागरिक नाल्यात प्लास्टिक सारख्या अविघटनशील वस्तू टाकणार नाहीत अशी अपेक्षा करूया.