तालुक्यातील पूर्व भागातील एका ग्रामपंचायत मधील काही सदस्य चक्क दार्जीलिंग या परदेशाला सहलीसाठी गेले होते. मात्र बेळगाव आणि परिसरात आलेल्या पुरामुळे त्यांची सहल अर्धवट झाली आहे. सहलीला गेलेल्या सदस्यांना पूरपरिस्थितीत अडकलेल्या काही नागरिकांनी शिव्याशाप घातल्यामुळे या सदस्यांना दार्जिलिंग वरून केवळ जेवण करून परतावे लागले आहे. त्यामुळे परिसरात दार्जीलिंग जेवणाची एकच चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील एका ग्रामपंचायतचे काही सदस्य सहलीसाठी दार्जिलिंगला गेले होते. एकीकडे पुराचा फटका नागरिकांना बसत असताना या सदस्यांना सहली करण्यातच धन्यता वाटली. असे असले तरीही हे सदस्य दार्जिलिंगला पोहोचतात न पोचतात संबंधित ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी आम्ही पुरात अडकले असून तुम्हाला सहली सुचतात काय? असा जाब विचारला. या सदस्यांना फोन केल्यामुळे यांची चांगलीच पंचाईत झाली.
हे सदस्य सहलीच्या नावाखाली एन्जॉय करण्यासाठी गेले होते. विशेष करून बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे असली तरी दार्जिलिंगला जाऊन एन्जॉयमेंट करण्याचा हेतू त्यांना चांगला महागात पडल्याचे दिसून येत आहे. बेळगाव वरून बेंगलोर व बेंगलोर वरून दार्जिलिंगला असा त्यांचा प्रवास झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दार्जिलिंगला पोहोचतात न पोचतात नागरिकांच्या शिव्या आणि शाप सुरू होताच त्यांना परतीचा मार्ग पत्करावा लागला.
ही सहल काढण्यासाठी एका सदस्याने दोन ते अडीच लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी परत आल्यानंतर त्या सदस्याची ही रक्कम देण्याचा ठराव देखील झाल्याची माहिती आहे. दार्जिलिंगला पोहोचल्यानंतर पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांकडून अनेक सदस्यांना वारंवार फोन गेल्यामुळे दार्जीलींगला जाऊन काहीही न खाता परतणे हे काही सदस्यांना चुकीचे वाटले. त्यामुळे त्यांनी निदान जेवण तरी करून जाऊ हा विचार मनी आणून दार्जीलिंग येथे केवळ जेवण करून आपला परतीचा प्रवास सुरू केला, अशी माहिती मिळाली आहे.
परतीच्या प्रवासात पुन्हा बेंगलोर येथे उतरल्यानंतर बेळगाव आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापूर परिस्थितीमुळे त्यांना काही काळ बाहेरच थांबावे लागले. मागील दोन दिवसांपूर्वीच ते सदस्य संबंधित ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांच्या या दार्जीलिंग जेवणाच्या मेजवानीचा सध्या सर्वत्रच वास दरवळत असून पंचक्रोशीत केवळ त्यांच्या या मेजवानीची चर्चा रंगली आहे.