पूर परिस्थिती आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे सगळीकडे अनेक गैरसोयी होत आहेत .अशीच गैरसोय बेळगावच्या सर्वात महत्त्वाच्या कॉलेज रोडवर होत असून या रोडवरील बीएसएनएलची फोन लाईन बंद आहे. रूट बिझी किंवा फोन डिसकनेक्टेड असे संदेश मिळत असून मोबाईलच्या जगातही इंटरनेट आणि इतर कारणासाठी बीएसएनएलच्या फोनवर अवलंबून असणाऱ्यांची झोप उडाली आहे.
कॉलेज रोडवर अनेक शिक्षण संस्था आहेत. याचबरोबरीने हॉस्पिटल हॉटेल्स व इतर अनेक संस्थांची कार्यालये आहेत. हा रस्ता सर्वात मोठा गजबजलेला रस्ता म्हणून बेळगाव शहरात ओळखला जातो. या ठिकाणची बीएसएनएलची लाईन पावसाच्या पाण्याने खराब झाली आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्याची वेळीच दुरुस्ती केली नाही. त्यामुळे व्यापार व उद्योगावर त्याचा परिणाम होत असून लवकरात लवकर बीएसएनएलची लाईन दुरुस्त करावी अशी मागणी वाढलेली आहे.
आज काल फोन वर बोलणारे कमी असले तरी कार्यालयांमध्ये ब्रॉडबँड कनेक्शन साठी बीएसएनएलच्या फोनचा वापर केला जातो. मात्र ही पूर्ण लाईनच खराब झाल्यामुळे फोनही नाही आणि इंटरनेट नाही अशी या लोकांची अवस्था आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.