सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक नद्यांनी आपले पात्र सोडले आहे.जिल्ह्यातील नद्यांना पावसामुळे पूर आलेला असून महाराष्ट्रातूनदेखील पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होत आहे.
त्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.यासाठी जिल्ह्यातील सगळ्या ठिकाणी आवश्यक त्या खबरदारीची उपयाययोजना करण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते,पंचायत इंजिनियरिंग आदी विभागांनी जनतेच्या,जनावरांच्या सुरक्षेसाठी बोटी आणि अन्य व्यवस्था करावी.बेळगाव,चिकोडी उपविभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये.नदीकाठावरील जनतेला सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी देखील व्यवस्था करावी.
एखाद्या वेळी दुर्घटना घडल्यास त्वरित तहसीलदारांना माहिती द्यावी आणि नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला त्वरित माहिती कळवावी.नदी पात्रात येऊ शकणारे विजेचे खांब हलविण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी.कोणत्याही अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून जाता कामा नये असा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.