देणगी गोळा करून भव्य हालता देखावा सादर करून गणेशोत्सव साजरा केला तरी तो आनंद साजरा करताना पाहायला येणाऱ्यांच्या डोळ्यात आनंद दिसणार नाही. कारण त्यांच्या डोळ्यात अश्रू असतील. यावर्षी ज्यांची घरे पडली, ज्यांचे संसार रस्त्यावर आले त्यांना विध्येची देवता गणेशाचा सोहळा तितका आनंदाचा असणार नाही.
एक गणेशोत्सव मंडळ म्हणून आम्ही विधायक कार्य करण्याची आणि ज्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याची हीच संधी आहे. विधायक गणेशोत्सव साजरा करण्याची.
बेळगाव शहर यावर्षी पहिल्यांदा पुरात अडकले. यंदा 60 वर्षानंतर पहिल्यांदा पूर आला. हा पूर आम्हीच केलेल्या पापांचा. आम्ही नद्या नाले आणि तलावांवर अतिक्रमण केले. त्या नद्या कधीतरी आपली चोरलेली जागा व्यापणार होत्या. सांडपाणी वाहून नेणारा नाला असो नाहीतर शुद्ध पाण्याचा तलाव. त्यालाही आपले अधिकार आहेत. निसर्गाने दिलेले हे अधिकार पाळताना ते निसर्गाने दिलेले नियम पाळतात आणि त्यात भरडले जातात ती सामान्य माणसे.
आज बेळगावच्या गल्ल्या दुःखात आहेत. प्रत्येक गल्लीत एक दोन घरे पडली आहेत. ही घरे सावरायची हीच वेळ आहे. एक सार्वजनिक मंडळ आपल्या व्याप्तीतल्या एक गल्लीला वाचऊ शकले तर भरपूर मदत होईल. हीच संधी आहे विधायक गणेशोत्सव साजरा करण्याची. वाचा आणि विचार करा.