बेळगाव जिल्ह्यातील बचाव कार्य पूर्ण झाले असून चारा छावण्या त्वरित उघडण्यासाठी आणि नुकसान भरपाई लगेच देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.चिकोडी तालुक्यातील चार गावात अजून लोक असून त्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला आहे.बाकी जिल्ह्यातील पूरग्रस्त जनतेला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.पुराग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याला प्रारंभ झाला आहे असे जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील तहासिलदारांशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुनर्वसन,नुकसान भरपाई याविषयी संवाद साधला आणि माहिती घेतली.यावेळी जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही.राजेंद्र आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काही पूरग्रस्त गावातील जनता गाव सोडण्यास तयार नाही त्यांना अन्न, पाणी आणि आवश्यक वस्तू पुरविण्याचे कार्य केले जात आहे.पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्यांना समजावून सांगून स्थलांतर करण्यात येणार आहे.
२००५ मध्ये केवळ कृष्णा नदीला पूर आला होता पण यावर्षी जिल्ह्यातील सगळ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती.३०० हुन अधिक गावांचे स्थलांतर करण्यात आले असून ४००हून अधिक निवारा केंद्रे उघडण्यात आली आहेत.निवारा केंद्रात पिण्याचे शुद्ध पाणी,उत्तम भोजन पूरग्रस्त जनतेला देण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सामाजिक संस्था देत असलेल्या आहाराच्या दर्जाची तपासणी करूनच वितरण करण्यात यावे.तपासणी न करता तसेच दिल्यास आरोग्य विषयक समस्या उदभवू शकतात.म्हणून जागरूकता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.