निसर्ग कोपला की काय होईल याचा नेम नाही. ज्यांच्यावर अशी परिस्थिती येते त्यांना आधार देण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही. हट्टीहोळ गल्ली शहापूर येथील एक कुटुंबाच्या बाबत असेच घडले आहे. अति पावसाने घर हिरावून नेले आणि यातून निर्माण झालेल्या ताणातुन घरचा करता पुरुषही हिरावून नेला. आता या कुटुंबाला सावरण्यासाठी सामाजिक आधाराची गरज आहे.
अनिल परशराम लाड( वय 52)रा. हट्टीहोळ गल्ली ,शहापूर यांचे काल हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
9 तारखेला त्यांचे घर कोसळले होते. अनिल यांनी आता आपला संसार पुन्हा कसा सावरायचा याचा ताण घेतला होता. घर हा एकमेव आधार त्यांना होता. त्यांना 19 वर्षांचा मुलगा आहे. पडेल ते काम करून ते घर आणि मुलाचे शिक्षण सांभाळत होते.
गरीब परिस्थितीतून वाट काढताना आता हे नष्ट झालेले घर पुन्हा कसे उभे करायचे याच काळजीत अनिल होते. यातूनच जास्त त्रास करून घेऊन त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
घर पडल्यामुळे तात्पुरती राहण्याची सोय झाली होती. पण त्यांची पत्नी व मुलाला या माणसाचाच आधार होता. पण तो आधारही निघून गेल्यामुळे हे कुटुंब वाऱ्यावर आले आहे.
परिसरातील नागरिक तसेच माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्यासारख्यानी त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याच्या कुटुंबाला धीर दिला आहे. आता सामाजिक सेवा संघटनांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत आहे.