पूरग्रस्त भागात हवाई दलाने एकूण साठहून अधिक मोहिमा राबवून जिल्ह्यात साडे पाचशेहून अधिक व्यक्तींना पूरग्रस्त भागातून सुखरूप बाहेर काढले.या मोहिमेत हवाई दलाच्या आणि नौदलाच्या पाच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.
एक आठवडा पूरग्रस्त भागात मोहीम चालली होती,अशी माहिती एअर मार्शल एस.के.घोटीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
७ ऑगस्ट रोजी सरकारकडून हवाई दलाची मदत पाहिजे असा संदेश आला आणि ८ ऑगस्ट पासून हवाई दलाची पूरग्रस्त भागत रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाली.कालपासून हंपी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून काल ३६५ जणांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले.आज २००हून अधिक व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे.
यामध्ये परदेशी आणि देशातील पर्यटकांची संख्या अधिक होती असेही घोटीया यांनी सांगितले.
सांबरा येथे एअर कमोडोर रविशंकर यांच्याकडे टास्क फोर्स कमांडर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.जिल्हा प्रशासनाशी त्यांचा समन्वय होता.त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन केले जात होते.अन्न पाकिटे,पाणी आणि अन्य साहित्याचे देखील हवाई दलाने पूरग्रस्त भागात वितरण केले.
पाच हेलिकॉप्टर आणि सत्तरहून अधिक हवाई दलाचे वैमानिक,कर्मचारी,जवान मोहिमेत सहभागी झाले होते.जीपीएस आणि नेव्हीगेशन सिस्टीमचा वापर पूरग्रस्त स्थळी जाण्यासाठी केला जात होता अशी माहितीही घोटीया यांनी दिली.