देशभरात पहिलेंदाच महिला सैन्य (मिलिटरी पोलीस) भरतीसाठी रॅलीचे आयोजन केले आहे.देशात एकूण पाच ठिकाणी महिला सैन्य भरती रॅली आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये बेळगावचा समावेश आहे.महिला सैनिक भरती रॅलीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी होते.दि.२२ ते २७ जुलै या कालावधीत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील शिवाजी स्टेडियममध्ये महिला सैनिक भरती होणार आहे.
कर्नाटकसह आंध्रप्रदेश,तामिळनाडू,महाराष्ट्र आणि केरळमधील महिला उमेदवार भरतीसाठी येणार आहेत.चार हजारहून अधिक महिला सैन्य भरती रॅलीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भरतीच्यावेळी कागदपत्रे तपासणीसाठी महसूल कर्मचारी मदत करणार आहेत.दोन रुग्णवाहिका भरतीच्यावेळी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे भरतीसाठी येणाऱ्या महिलांना माहिती देण्यासाठी मदत केंद्रे उघडण्यात येणार आहेत.याशिवाय वैद्यकीय कर्मचारी,तपासणीसाठी आवश्यक उपकरणे आदींची व्यवस्था जिल्हा आरोग्य खात्यातर्फे करण्यात येणार आहे.
महिला सैन्य भरतीच्यावेळी पोलीस बंदोबस्त देखील पोलीस खात्यातर्फे ठेवण्यात येणार आहे.बैठकीला निवासी जिल्हाधिकारी एच.बी.बुधेप्पा,सैन्य भरती अधिकारी कर्नल प्रणित दयाळ,स्टेशन कमांडर बी.एस.घिवारी, सैनिक कल्याण आणि पुनर्वसन अधिकारी ईश्वर कुडोळी आणि इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.