बेळगाव शहरातील रहदारीला शिस्त लावण्यासाठी म्हणून शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर नो पार्किंग चा नियम लागू करून त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनांना उचलून देण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे .अशा प्रकारच्या वाहनांना दंड आणि उचलून घेण्याचा खर्च असा एकत्रितरीत्या लादण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावचे नागरिक संतप्त झाले असून पहिल्यांदा पार्किंगसाठी जागा कुठे आहे ते सांगा आणि त्यानंतर नो पार्किंगच्या जागा सांगा अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत .
बेळगावचे पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांनी बेळगाव शहरातील 21 रस्ते शोधून त्यावर नो पार्किंग झोन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जिल्हा इस्पितळ रोड, कॉलेज रोड, केएलई रोड, संगोळी रायान्ना सर्कल रोड आणि इतर जास्त रहदारी असलेले रस्ते आहेत.
पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्यांच्या आजूबाजूने पार्किंग करण्यात येणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर कारवाई केली जात असून एक खाजगी कंपनी वाहने उचलून नेण्यासाठी नेमण्यात आली आहे. दुचाकीसाठी एकूण दंड सोळाशे पन्नास असून त्यापैकी एक हजार रुपये हा नो पार्किंगमध्ये पार्क केल्याबद्दल दंड आहे तर 650 रुपये वाहन उचलून नेण्यासाठी आहेत. त्याच प्रकारे जर कार चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यास त्यासाठी दोन हजार रुपये घेतले जात असून एक हजार दंड आणि 1000 वाहन उचलून नेण्यासाठी आहेत.
कुठलेही वाहन उचलून न्यायचे असेल तर पोलिसांना पहिला चुकीच्या ठिकाणी पार केलेल्या वाहनाचे फोटो काढावे लागतात. त्यानंतर त्या वाहनाचा नंबर लाऊडस्पीकरवरून पुकारावा लागतो. आजूबाजूला वाहन चालक असल्यास लवकरात लवकर त्याला बोलावून घेऊन त्याच्याकडून दंड वसूल करता येतो . त्यानंतर वाहन चा मालक किंवा चालक न आल्यास तेव्हां उचलून नेता येते मात्र वाहन उचलून नेण्यापूर्वी वाहनाचा नंबर आणि वाहनाचे नाव पोलिसांनी स्पीकर वरून पुकारणे गरजेचे आहे.
सध्या वाहने उचलून देण्याचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे .यासाठी पहिल्यांदा पार्किंगची जागा द्या आणि नंतर नो पार्किंग ची जागा द्या असे नागरिक म्हणत आहेत .त्याबद्दल पोलिसांचे मत वेगळे आहे पार्किंगची जागा देणे आमचे काम नसून ते महानगरपालिकेचे काम आहे आम्ही फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.